वृक्षारोपणत लावलेल्या रोपनाचे आत्मवृत 
Vriksharopanata lavalelya ropanace atmavrta

“शुक् शुक्, शुक् शुक्. अरे मुलांनो, जरा इकडे या. अरे तुम्ही कोणत्या कामासाठी निघाला आहात ते मला माहीत आहे. यंदाच्या वनमहोत्सवात झाडे लावण्यासाठी तुम्ही निघाला आहात, हे तुमच्या हातांतील त्या कोवळ्या रोपांवरून आणि तुमच्या उत्साहावरून मी जाणते. मला पण येथे तुमच्यासारख्या मुलांनीच चार वर्षांपूर्वी लावले होते.

“आजही तो दिवस मला चांगला आठवतो. वनसप्ताह चालू होता. तेव्हा विदयमान काळात वृक्ष लावणे किती आवश्यक आहे हे तुमच्या गुरुजींनी तुम्हांला पटवून दिले होते. मग तुमच्या कोवळ्या हातांनी माझे येथे रोपण झाले होते. त्यावेळी मी पण अतिशय नाजूक होते. एका छोटया 'नर्सरीत' मोठ्या काळजीपूर्वक माझा जन्म झाला होता व संगोपनही केले गेले होते. तुम्ही जेव्हा मला व माझ्या भाईबंदांना या मोकळ्या माळावर स्थानापन्न केले होते त्याक्षणी मला विशेष आनंद झाला होता. वाऱ्यावर हलून मी माझा आनंद व्यक्त करीत होते.

“केवढ्या आशा फूलल्या होत्या, तेव्हा माझ्या मनात! आज नैसर्गिक मानवी जीवनाचे संतुलन बिघडले आहे ते आपण काही अंशाने तरी दुरुस्त करू. या ओसाड माळरानावर काही वर्षांत वृक्षराजी फुलेल. त्यामुळे हवेतील प्रदूषण कमी होईल. पावसाच्या धारांना आम्ही आमच्या उंच बाहूंनी बोलावून घेऊ अशी आशाही तेव्हा माझ्या मनात फुलली होती. पण त्यावेळी मी खूप छोटे होते. मला खूप मोठे व्हायचे होते. पण अरेरे“माझ्या या सर्व आकांक्षांवर निराशेचे पाणी पडले. कारण तुम्ही आम्हांला या माळावर लावून गेलात आणि पुन्हा फिरकलातही नाहीत. पगारी माळ्याने काही दिवस काळजी घेतली, पण नंतर तोही इकडे येईनासा झाला.

“पावसाचा पत्ता नव्हता, जमिनीच्या पोटातले पाणी पुरेसे नव्हते. मोकाट सुटलेली गुरे, तुमच्यापैकी काही नाठाळ मुले आमच्या जिवावर उठलेली होती. माझे कितीतरी दोस्त या संकटात नामशेष झाले, कित्येकांची वाढ खुंटली. मनातील जगण्याच्या चिवट ओढीमुळेच मी जिवंत राहिलो आहे. जशी वाढ व्हावी तशी झाली नाही, म्हणूनच मुलांनो, मी तुम्हांला आता हटकले. तुम्ही झाडे लावता तशी ती दत्तक घ्या, वाढवा. मित्रांनो, मला जगायचे आहे. मला मोठे व्हायचे आहे. मोठ्या वृक्षाच्या रूपात मी स्वतःला पाहू इच्छिते. इतरांना मी फुले, फळे व सावली देऊ इच्छिते. मानवाच्या कल्याणातच आमच्या जीवनाचे सार्थक आहे."

आवाज बंद झाला. पण आम्हांला आमच्या कामातील त्रुटी जाणवली व आपण लावलेल्या रोपटयांची आपण काळजी घ्यायची असा आम्ही निश्चय केला. 'झाडे लावा व ती जगवा' असाच संदेश त्या रोपाने आम्हांला दिला होता.