निसर्ग-मानवाचा मित्र
Nature is the Friend of Man
निसर्ग-मानवाचा मित्र मराठी निबंध : मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात प्रदर्शन भरले होते. तशी मुंबईत अनेक प्रदर्शने नेहमीच भरत असतात. परंतु हे प्रदर्शन वैशिष्ट्यपूर्ण होते. हे प्रदर्शन होते 'गुलाबपुष्पांचे'. आणि ते पाहण्यासाठी वेळात वेळ काढून लोकांनी अगदी गर्दी केली होती.
दोन खोल्यांच्या एखादया छोटया घरकलात डोकावले तर आपल्याला काय आढळते? त्या छोट्याशा घरकुलातील सामानाच्या दाटीवाटीत एखाद-दुसरी कुंडी असतेच. दरवर्षी मे महिन्याच्या सुट्टीत लोक मोठ्या संख्येने काश्मीरला, सिमल्याला जात असतात. या साऱ्या गोष्टी काय. सांगतात? 'वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे' हे तुकारामांचे अनुभवाचे बोल सर्वांच्याच रक्तात भिनलेले आहेत. नाहीतरी माणूस तरी काय? निसर्गाचेच लेकरू ना! त्याला आपल्या इतर भावंडांविषयी ओढ असणारच. आजच्या या विज्ञानयुगात तो यंत्राच्या जंजाळात जितका जितका अडकतो तितके त्याचे मन अधिकाधिक निसर्गाकडे खेचले जाते. म्हणून तर यंत्राच्या जगात जगणारा माणूस वेळात वेळ काढून दोन दिवस तरी आपल्या खेड्यातील घराकडे धाव घेतो.
निसर्ग आणि मानव यांच्यातील ही मैत्री फार जुनी आहे. अगदी अनादिकालापासूनच निसर्ग हा माणसाचा सोबती आहे. निसर्गाच्या कुशीत विसावणाऱ्या ऋषीमनींनाच काव्य स्फरले; एकापाठोपाठ एक वेदऋचा निर्माण होऊ लागल्या. आकाशातील बदलणारे रंग पाहून कवींच्या वाणीला भरती आली. निसर्गाच्या त्या पवित्र वातावरणात विचारवंतांनी तत्त्वमंथन केले. त्यातूनंच उपनिषदे, श्रुती, स्मृती जन्माला आल्या.
या निसर्गाचे मानवावर केवढे उपकार आहेत! तो त्याची भूक भागवितो. तहान शमवितो. मंद, मधुर झुळकींनी श्रमपरिहार करतो. सुगंधित फुलांनी त्याचे जीवन सुगंधित करतो. थकल्याभागलेल्याला सावली देतो. उन्हाचा त्रास झाला तर पाण्याचा वर्षाव करतो. घर, निवारा उभारण्यासाठी लाकूड देतो. वस्त्रासाठी कापूस देतो. अन्न शिजविण्यासाठी जळण देतो. या सोबत्याने माणसाला आधार दिला नाही, असा मानवाच्या जीवनात एकही क्षण नाही. संस्कृत सुभाषितकार मित्रलक्षणे सांगताना म्हणतात
"उत्सवे व्यसने चैव दुभिक्षे शत्रुविग्रहे।
राजद्वारे स्मशाने च यस्तिष्ठति स बान्धवः॥" या साऱ्या ठिकाणी निसर्गाची साथ माणसाला लाभते. पण याहूनही अधिक मोलाच्या गोष्टी हा मित्र आपल्या मानवमित्रासाठी करीत असतो. विशेष म्हणजे माणसाचा एकाकीपणा तो सुसह्य करतो, आणि आपल्या आचरणाने तो अनेक मौलिक गुणांची शिकवण मानवाला देतो. स्वतः उन्हात उभे राहून दुसऱ्याला सावली, फळे, फुले देणारी झाडे माणसाला जणू सांगत असतात, “अरे दुसऱ्यासाठी जगण्यातच जगण्याचा खरा अर्थ आहे.” “आपल्याजवळ जे काही आहे ना ते दुसऱ्याला देत जा,' हे सांगतच सरिता सर्वांचे जीवन फूलवीत मार्गक्रमण करीत असते. आपल्या मनाला खोली किती असावी हे
सागराचा अथांगपणा दाखविते. भव्यतेचे परिमाण काय हे उत्तुंग पर्वत सांगतात, क्षमाशीलता किती पराकोटीची असू शकते हे पृथ्वी सांगते. “अरे मित्रा, अडचणी-अपयश येणारच त्यावर मात करायची," हे जाळे विणण्यासाठी धडपडणारा कोळी आपल्याला सांगत असतो. “चिकाटी हवी, असाध्य ते साध्य करता येतं बघ!" हे आपल्याला झाडावर लागलेले भलेमोठे मधमाश्यांचे पोळे सांगत असते. दहाजणींच्या प्रयत्नांतून एवढा मोठा गव्हाचा दाणाही कोठारात नेता येतो ही सहकाराची शिकवण मुंग्या देतात; तर गात्रे थकली तर मरण स्वीकारीन; परावलंबी होणार नाही हे वनराज सांगतात.
निसर्ग पावलोपावली माणसाला शिकवीत असतो आणि माणूस चुकला तर हा सोबती त्याला टपल्याही मारतो. आपल्या कर्तृत्वाचा माणसाला गर्व झाला की हा मित्र त्याला चांगलाच धडा देतो. मग माणसाचे डोळे उघडतात व पुन्हा तो आपल्या या निसर्गसख्याची संगतसाथ शोधायला लागतो.
0 Comments