बचत लहान, फायदा महान 
The Smaller the Savings, The Greater the Benefit


बचत लहान, फायदा महान चिंतनात्मक  मराठी निबंध : आम्ही ठरविलेले बचतीचे उद्दिष्ट गाठल्यामुळे आज शाळेत माझा व माझ्या काही मित्रांचा सत्कार करण्यात आला. एका मोठ्या राष्ट्रीयीकृत बँकेचे व्यवस्थापक या समारंभाला अध्यक्ष म्हणून हजर होते. आमचा गौरव करताना ते म्हणाले, “देशातील सर्व मुलांना लहानपणीच संचयाचे महत्त्व समजल्यास आपल्या राष्ट्राला भविष्यकाळात कोणतीच उणीव भासणार नाही." खरोखर वेळीच केलेली बचत ही अडचणीच्या काळात केवढी मोठी कामगिरी करीत असते!

 

आमच्या वर्गातील बहुसंख्य मुलांची बचतखाती आहेत. दर महिन्याला आम्ही काही ना काही तरी शिल्लक टाकीत असतो. त्यामुळेच, परवा आमच्या एका वर्गमित्राला परीक्षेच्या अर्जाची फी भरणे शक्य झाले नाही तेव्हा आम्ही आमच्या बचतखात्यांतून रक्कम काढून त्याचा अर्ज वेळेवर पाठवून देऊ शकलो. त्याच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू उभे राहिले व गहिवरल्या आवाजात तो आम्हांला म्हणाला, “दोस्तांनो, सुट्टीत कष्ट करून प्रथम तुमचे पैसे परत करीन आणि मग माझेही अल्पबचत खाते मी सुरू करीन.” ज्योतीने ज्योत प्रज्वलित होते तसेच आहे हे कार्य!


संसारात 'कर्ज' हे कर्करोगासारखे आहे. ते कधीच फिटत नाही, कर्ज हे सतत वाढतच राहते आणि शेवटी ते माणसालाच गिळून टाकते. हे टाळण्यासाठी अल्पबचतीची सवय हवी. इच्छा असेल तर मार्ग सापडतो. कितीही कमी उत्पन्न असले तरी आपण बचत केलीच पाहिजे. त्यासाठी आठवड्यातून एक दिवस उपवास केला, चहा कमी घेतला, चित्रपट कमी पाहिले, थोडी छानछोकी कमी केली तर आपण अल्पबचत करू शकतो. ती आपल्याला अडीअडचणीला उपयोगी पडते, म्हातारपण सुसहय करते. अशा या अल्पबचतीतून स्वार्थ साधता येतो, त्याचप्रमाणे परमार्थही साधला जातो.

 

आपली बचत लहान असली, तरी ती देशाचे महान कार्य साधते. या अल्पबचतीचा जन्मही अशाच अडचणीतून निर्माण झाला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या विकासासाठी सरकारने पंचवार्षिक योजना आखल्या. पण त्यासाठी पैसा कोठून आणणार? सरकारला कर्ज हवे होते. सरकारने प्रजेला साद घातली. प्रत्येकाला आपल्या मिळकतीतील पै-पैसा बचत करण्यास आवाहन केले आणि पाहता पाहता मोठ्या रकमा उभ्या राहिल्या. मुंगीच्या कणाकणाने कोठार भरते, तसा सरकारी खजिना भरला. सरकारची नड भागली आणि लोकांना बचतीची सवय लागली.


ही बचतीची सवय जीवनात फार उपयोगी पडते. बचत काही फक्त पैशाचीच करता येते असे नाही. आपण अन्नाची बचत केली तर अवर्षण, अतिवर्षण यांमुळे येणाऱ्या दुष्काळाशी आपण मुकाबला करू शकतो. वेळेचा अपव्यय टाळला तर मोठमोठी कामे योग्य कालावधीतच पार पाडू शकतो. गळणारा नळ बंद करून आपण पाण्याची बचत केली पाहिजे, विनाकारण जळणारा दिवा मालवून आपण  विजेची बचत केली पाहिजे. कुमारांना मार्गदर्शन करताना एकदा प्रसिद्ध साहित्यिक ना. सी. फडके म्हणाले होते, “कुमारवय हे बचतीचे वय आहे. या वयात तुम्ही जी ज्ञानाची बचत कराल ती तुम्हांला पुढील जीवनात फार उपयोगी पडेल. म्हणून कणाकणाने धन साठवावे. तसेच क्षणाक्षणाला ज्ञान संपादावे.” सुखी, यशस्वी जीवनासाठी सर्व त-हेची बचत आवश्यकच आहे.