आमची मायबोली 
Our Mother Tong

मराठी असे आमुची मायबोली "मराठी असे आमुची मायबोली, जरी भिन्नधर्मानुयायी असू।हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू, वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी॥" अशा त-हेने आपल्या मायबोलीची गोडवी गाणारे आम्ही आज खरोखर तिचे पांग फेडीत आहोत का? 

प्रतिष्ठेच्या पोकळ व आकर्षक कल्पनांत गुरफटलेल्या आमच्या मनाला अजूनही इंग्रजीचे आकर्षण आहे. मराठी भाषिक चार सुशिक्षित माणसे एकत्र आली तर ती गप्पा मारण्यासाठी इंग्रजीला जवळ करतात. 

दीडशे वर्षांची राजकीय गुलामगिरी संपली तरी इंग्रजीची मानसिक गुलामगिरी सोडायला आम्ही तयार होत नाही.

 कारण आमच्या मायबोलीची थोरवी आजही आम्हांला उमगली नाही; तिचे सामर्थ्य आजही आम्हांला कळले नाही असेच म्हणावे लागेल.

मराठी मायबोलीविषयी लिहिताना साने गुरुजी म्हणतात, “आमच्या मराठीचे भाग्य असे आहे की, तिचा पहिलाच कवी हिमालयाएवढा मोठा महाकवी होऊन गेला. त्याच्या काव्यशक्तीला स्पर्श करणारे सामर्थ्य अजून मराठीत निर्माण झालेले नाही.'