पोस्टमन 
Postman

पोस्टमनची वाट पाहणे हा माझा एक आवडता छंद आहे. पोस्टमन स्वतः ओझे वाहतो आणि आपल्या आप्तमित्रांच्या सुखदुःखाच्या गोष्टी आपणापर्यंत पोहोचवितो; म्हणून पोस्टमन हा मला नेहमीच फार जवळचा वाटतो. सदा शिवणेकर हा त्यांपैकीच एक. पण तरीही तो इतरांहून वेगळा असा मला वाटला. __माझ्या बोलक्या स्वभावामुळे मी सर्व पोस्टमनशी आपणहूनच बोलत असते. पण बहुतेक वेळा असा अनुभव येत असतो की, आपण विचारलेल्या प्रश्नांना हे लोक केवळ जुजबी उत्तर देऊन गप्प बसतात. पण सदा मात्र जिज्ञासेपोटी काही ना काही प्रश्न विचारीत असतो. माझ्या नावापुढील एम्. ए. ही पदवी वाचून सदाने मला एकदा विचारले, “बाई, आपण एम्. ए. आहात ना! आपले एम्. ए. साठी विषय कोणते?" आणि लगेच त्याला वाटले की, आपण विनाकारण अतिउत्साह दाखविला की काय? म्हणून सदा म्हणाला, “बाई, मी सध्या बाहेरून बी. ए. चा अभ्यास करीत आहे. तेव्हा माझा व आपला विषय एकच असला तर काही शंका विचारू शकेन या हेतूने मी आपणांस विचारले. राग नसावा.” सदाच्या त्या स्पष्टीकरणाने मला हस . सुदैवाने माझा व सदाचा विषय एकच निघाला आणि मग सदा आपल्या शंका विचारावयास माझ्याकडे येऊ लागला. 

सदाला मी प्रथम पाहिले तो दिवस माझ्या चांगला लक्षात आहे. आमच्याकडे पूर्वी येणाऱ्या शेख या पोस्टमनबरोबर काही दिवस एक मुलगा येत असे. नुकताच एस्. एस्. सी.च्या वर्गातून बाहेर पडलेल्या त्या मुलाला शेख सारे समजावून देत असे. त्या मुलाने घातलेले कपडे त्याला बरेच सैल होत होते. त्यामुळे तो बिचारा शेतातल्या बुजगावण्यासारखा दिसत होता. 

 

एक दिवस अचानकपणे माझी त्यांच्याशी रस्त्यात गाठ पडली. त्या मुलाला पाहून मला हसू आले; पण ते आवरून मी विचारले, 'काय नवीन भरती का?' 'हो.' त्याने उत्तर दिले. मग उगाचच कुतूहलाने मी त्याला नाव विचारले असता, 'सदा शिवणेकर' असे उत्तर मिळाले व मला ते जवळचे वाटले. पुढे सदा नियमित येत राहिला. मला आप्तमित्रांची पत्रे देत राहिला. माझी पुस्तकांची, मासिकांची पार्सले देताना पुन्हा त्याचे कुतूहल चाळविले गेले आणि त्याने मला एकदा विचारले, “बाई, आपण लेखन करता वाटतं?' माझे होकारार्थी उत्तर ऐकून तो प्रसन्नसे हसला.


माझ्या शेजारणीला सदाचे हे प्रश्न म्हणजे आगाऊपणा वा चांभारचौकश्या वाटतात, पण मला तसे वाटत नाही. तिच्या मते पोस्टमनने पत्र टाकावे आणि निघून जावे. फार तर वर्षातून एकदा पोस्त मागण्यासाठी तोंड उघडावे. म्हणजे तिला आपली टपालसेवा करणारा निव्वळ 'पोस्टमन' हवा होता, त्याच्यातील माणूस नको होता. पण मला तर सदामधील निरागस माणूसच अधिक आवडत होता. अभ्यासाच्या निमित्ताने सदाशी माझी जास्त ओळख झाली आणि त्यातीलत्या छोट्या माणसातील मोठेपण खूपच ज्ञात झाले. तशी सदाच्या घरची परिस्थिती चांगली होती; पण वडिलांच्या व्यसनाधीनतेने त्याला वाईट दिवस आले होते. पण त्यातही एक चांगली गोष्ट मला भावली ती म्हणजे अशाही या प्रतिकूल दिवसांत सदाच्या मनात जीवनाबद्दल कटुता नव्हती, उलट श्रद्धा होती. त्याचे श्रेय जात होते सदाच्या आईकडे. म्हणून तर दिवसभर कष्ट करूनही सदा शिकत होता.

 

पोस्टातल्या कामाबद्दल सदाला खरोखरच आवड होती. सॉटिंग करणे, पत्रे घरोघरी पोहोचविणे ही कामे तो आवडीने करी. त्या कामांत त्याला सजीवता वाटे. आता सदाला सायकल मिळाली आहे. “तुला कधी कंटाळा येत नाही का रे या कामाचा?" मी विचारले. “छे, मुळीच नाही. यामुळे, उलट कितीतरी लोकांच्या ओळखी होतात. तुम्ही नाही का भेटलात मला याच कामामुळे." या शब्दांतून सदाचे समाधान व्यक्त होत होते. यंदा सदा बी. ए. च्या परीक्षेला बसला आहे. पण बी. ए. झाल्यावरही तो टपालखाते सोडणार नाही. तसे करणे त्याला कृतघ्नपणाचे वाटते. अडचणीच्या वेळी याच खात्याने आपल्याला हात दिला, असे तो मानतो. म्हणन याच खात्याच्या पुढील परीक्षा तो देणार आहे.

 

दिवाळी आली व गेली पण सदाने माझ्याकडे पोस्त मागितले नाही. मी विचारले, "का रे सदा, दिवाळीच्या पोस्तसाठी तू आला नाहीस कसा?” "बाई, पोस्तापेक्षा केवढी अमोल मदत मला तुमच्याकडून मिळाली. मीच तुम्हांला गुरुदक्षिणा दयायला हवी!” सदातील माणुसकीचा मला असा वारंवार प्रत्यय येतो.