सागराचे मनोगत 
Sagrache Manogat

माझ्या काठावर जमलेल्या मुशाफिरांनो, क्षणभर येथे थांबा आणि माझे मनोगत ऐकून घ्या. आजवर अनेकदा मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न केले पण ते यशस्वी झाले नाहीत. शेवटी मलाही मर्यादा आहेतच ना!

 

“मानवा, महासागर म्हणून तू माझे कौतुक करतोस. रत्नाकर' म्हणून मला संबोधून माझ्या वैभवाचा गौरव करतोस तरीपण हे मानवा, माझ्या उणिवा मी जाणतो. माझ्या काठी आलेल्या तुझी तहान मी भागवू शकत नाही. माझे पाणी खारट आहे म्हणून तुम्ही सर्वजण मला नावे ठेवता. पण हा खारटपणा माझ्यात का उतरला माहीत आहे तुम्हांला? साऱ्या जगाची सारी घाण, सारे क्षार मी सामावून घेतो. धर्म, जात, पंथ, वर्ण इत्यादी कारणांवरून तुम्ही झगडता; पण तसा भेदभाव माझ्याकडे नाही. तुमच्या श्रीगजाननांच्या मूर्तीना मी माझ्यात सामावून घेतो, त्याचप्रमाणे इस्लाम बांधवांचे ताबूतही माझ्यातच समर्पित होतात!


“मनुपुत्रांनो, तुम्ही मला कितीही नावे ठेवलीत ना, तरी तुम्ही माझे लाडके आहात! म्हणूनच तुमच्या साऱ्या लीला मी आजवर सहन केल्या. तुमच्यातल्या एका कवीने माझी निदानालस्ती करताना म्हटले आहे की, हा पयोधर पाणी साठवून ठेवतो म्हणून त्याचे स्थान खाली आहे आणि पयोद पाणी देतो म्हणून त्याचे स्थान उंचावर, आकाशात आहे. पण या मूर्ख कवीला हे माहीत नसावे की, पयोधर आहे म्हणूनच पयोद आहे. बरे असू दे ते. मला आज तुमच्याशी बोलायचे आहे ते वेगळेच. मानवा, आजवर तू समुद्रमंथनाची कथा केवळ कौतुकाने सांगत होतास. पण आज मात्र तु खरोखरच माझे मंथन चालविले आहेस. देवकथेतील चौदा रत्नांपेक्षाही अधिक अमूल्य, या औदयोगिक युगाला आवश्यक असे इंधन तुम्ही माझ्या अंतःकरणातून बाहेर काढले. तुमच्या बुद्धिवैभवाचे मला सदैव कौतुक वाटते. म्हणूनच यंत्रांकडून घुसळले जाण्याचे सर्व दुःख मी सहन करतो. तुमच्या साहसाने मी दिङ्मूढ होतो. तुमच्यातील काहीजण वर्षानुवर्षे माझ्या उदरात दडलेल्या अंटाक्टिकावरही पोहोचले आहेत.


"अभिमानास्पद वाटणाऱ्या या घटना घडतानाच पुढच्या काही अशुभ घटनांची मला चाहूल लागत आहे. अंटाक्टिका खंडावरील अधिवासाबाबतचे झगडे आताच सुरू होऊ लागले आहेत. हिंदी महासागरावरील तुमची ही सशस्त्र आरमारी जहाजे पाहून माझे अथांग मनही व्यथित होते. मानवांनो, हे थांबवा. आपापसांत भांडू नका. अरे या महासागराजवळ अमाप संपत्ती आहे, त्याचा उपभोग सर्वांनी घ्या."