मी कल्पवृक्षाखाली बसतो तेव्हा 
When I sit under the Kalpavriksha


विदयापीठाच्या वनस्पतिविभागाने भरविलेले ते एक प्रदर्शन होते. विश्वातील सर्व वृक्षवेलींची ओळख आपण या प्रदर्शनात करून दिली आहे, असा प्रदर्शन-नियोजकांचा दावा होता. म्हणून मी पुनः पुन्हा फिरून ते प्रदर्शन पाहत होतो. शेवटी एका संयोजकाचे लक्ष माझ्याकडे गेले आणि त्याने मला विचारले, “आपणाला काय हवे आहे?" मी मुळातच गोंधळलेलो होतो त्यात या प्रश्नाने अधिकच भर पडली आणि मी त्याला सांगितले, “मला कल्पवृक्ष हवा आहे, मला कल्पवृक्षाखाली बसायचे आहे." क्षणभर तो व्यवस्थापक गोंधळला; पण तो बराच चलाख असावा. लगेच सावरून तो म्हणाला, "चला, मी तुम्हांला कल्पवृक्ष दाखवतो." मग आम्ही दोघेजण त्या प्रदर्शनाच्या दुसऱ्या टोकाला गेलो. तेथे लोकांची गर्दी मुळीच नव्हती. अगदी कडेला एक बुटकेसे डेरेदार झाड होते, त्याकडे बोट दाखवून तो म्हणाला, “हा पाहा कल्पवृक्ष. आता तुम्ही याचे निरीक्षण करा. मी येतो हं, मला दुसरे काम आहे."

त्या निर्जन भागात आता मी एकटाच होतो. दूरवर माणसांचे आवाज ऐकू येत होते; पण मी होतो त्या भागात माणसांचीच काय ; पण पक्ष्यांचीही चाहूल ऐकू येत नव्हती. त्या क्षणी मला हसू आले. या सर्वांना या कल्पवृक्षाची व त्याच्या सामर्थ्याची कल्पना नसावी बहुतेक. असे वाटले आणि मी विचार केला-चला, आपण तरी आपली अनेक वर्षांची मनीषा पूर्ण करून घ्यावी. झाड जरा खालच्या बाजूला होते, तेव्हा तेथे उतरून झाडाखाली बसावे असे मी ठरविले. म्हणून मी थोडे खाली उतरलो. पण तेवढ्यात मनात आले की प्रथम आपण हे निश्चित करू या, की कल्पवृक्षाखाली बसून काय मागायचे? हो, उगाचच काही चुकीचे मागितले तर शेवटी आपल्यालाच पश्चात्ताप करायची वेळ यायची. तेव्हा आधी पूर्ण विचार करून ठरवावे आणि मगच मागणी करावी. काय मागावे बरे या कल्पवृक्षाकडे? खूप पैसा मागावा का? हो, कारण पैशाने सर्व गोष्टी साध्य होतात. कारण ‘सर्वे गुणाः काञ्चनमाश्रयन्ते', असे विद्वानांनी म्हटलेच आहे. तेव्हा ठरले, कल्पवृक्षाला सांगावे की, कधीही संपणार नाही इतकी संपत्ती दे. पण ही एवढी संपत्ती आपण घरी कशी नेणार? आणि घरी तरी कोठे ठेवणार? एकदम एवढा पैसा आला की लोकांच्या डोळ्यांत भरणार. लोक समजतील की आपण काही तरी अनैतिक मार्गाने हा पैसा मिळविला. शिवाय 'इन्कम टॅक्स' वाले पिच्छा पूरवतील आणि सर्वांत मोठी भीती म्हणजे चोरांची. चोरांमूळे या पैशापायी प्राण गमवावे लागतील. मग काय मागावे बरे या कल्पवृक्षाकडे?

 

विदया मागावी का? कोणत्या शाखेतील पदवी मागावी? कला, शास्त्र की व्यापार? कोणती पदवी मागावी? एम्. ए., एम्. एस्सी., एम्. कॉम., पीएच्. डी., डॉक्टर की इंजिनीअर? पण कल्पवृक्षाकडून मिळविलेल्या या पदवीचा आपण उपयोग करू शकू का? लोक विश्वास ठेवतील का आपल्यावर? डॉक्टर झालो तर आपण रुग्णांवर औषधोपचार करू शकू का? असे एक ना अनेक प्रश्नांचे मनात काहूर माजले, पण त्याच क्षणी माझे सुसंस्कारित मन आक्रंदून उठले. छे, छे; हे बरोबर नाही. कष्टाविना विदया साध्य होणे शक्य नाही. ती विदया, विदया नव्हेच, ते ज्ञान, खरे ज्ञानच नव्हे. कल्पवृक्षाजवळ काय मागावे? हा प्रश्न अदयापि सुटलाच नव्हता.

 

यापूर्वी होऊन गेलेल्या मोठमोठ्या लोकांनी काय मागितले होते त्याची मला आठवण झाली. मोरोपंतांनी देवाला प्रार्थिले, 'सूसंगती सदा घडो.' ज्ञानदेवांनी पसायदान मागितले-'जो जे वांच्छील, तो ते लाहो प्राणिजात.' मग आपण काय मागावे? कशी कोण जाणे, मला भोवतालची जाणीव झाली. सर्वत्र अंधार पडला होता. दूरवर येणारा माणसांचा आवाजही बंद झाला होता. बहतेक प्रदर्शन बंद झाले असावे. किर्रऽऽ असा रातकिड्यांचा आवाज येत होता. मी घाबरून पटकन कल्पवृक्षाखाली गेलो आणि म्हटले, “मला आता घरी पोहोचव." दुसऱ्या क्षणी मी माझ्या घरी होतो.