अख्खी म्हैस पाच रुपयात 
Akkhi Mhes Panch Rupyat



एका माणसाची म्हैस चोरीस गेली. तो मनात म्हणाला, 'आपली म्हैस गावातल्याच दोन-तीन चोरट्या माणसांपैकीच कोणीतरी चोरली आहे. आता चार दोन दिवसात म्हैस-चोर म्हशीला घेऊन गावाबाहेर जाईल आणि तिला विकून पैसे घेऊन येईल. तत्पूर्वी ती म्हैस मिळविण्याची काहीतरी युक्ती काढली पाहिजे.' 


मनात हा विचार येताच त्याला एक युक्ती सुचली. त्याप्रमाणे त्याने गावात दवंडी पिटली, 'ऎका हो ऎका ! दररोज पंधरा शेर दूध देणारी माझी तरणीबांडी म्हैस नाहीशी झाली आहे. ती शोधून मला आणून देणार्‍यास मी ती म्हैस अवघ्या पाच रुपयात विकत देईन.'ज्याने ती म्हैस चोरली होती, त्याच्या कानी ती दवंडी गेली. 


तो मनात म्हणाला, 'आपण केलेली चोरी उघडकीस आली तर म्हशीपरी म्हैस जाईल, आणि वर अब्रुही जाईल. त्यापेक्षा 'तुझी म्हैस मला रानात मिळाली,' असं त्या म्हशीच्या मालकाला सांगाव, आणि त्याला पाच रुपये देऊन, म्हशीला खरेदी करुन घरी घेऊन यावं.' असा विचार करुन त्या चोरट्या माणसाने त्या म्हशीला तिच्या मालकाकडे नेले आणि म्हैस रानात मिळाल्याचे सांगून, त्याला पाच रुपये देऊ केले व त्या किमतीत त्या म्हशीला विकत मागितले. 


यावर म्हशीचा मालक त्या म्हैस चोराला म्हणाला, 'माझा शब्द म्हणजे शब्द. दवंडीत सांगितल्याप्रमाणे ही दुभती म्हैस मी तुला पाच रुपयात द्यायला तयार आहे, पण एका अटीवर. तिच्याबरोबर तिच्या गळ्यातला हा लोखंडी साखळदंडही तू विकत घेतला पाहिजे.चोरटा म्हणाला, 'ठिक आहे. त्या साखळदंडाचीही किंमत मी मोजतो. फार तर पाच-सहा रुपये एवढीच किंमत आहे ना त्याची ?'म्हशीचा मालक म्हणाला, 'छे छे ! साखळदंडाची किंमत आहे नऊशे पंच्चाण्णव रुपये.'म्हशीचा मालक आपल्यापेक्षा सवाई निघाला हे पाहून, तो चोरटा हात चोळीत तिथून चूपचाप निघून गेला.