अशी झाली फटफजिती 
Asi jhali phataphajiti

 

वनराई जंगलात ‘बंटी’ नावाचा ससा रहात असे. पांढरशुभ्र अंग, इटुकले डोळे आणि गोड-मधाळ बोलणं ह्यासाठी बंटी संपूर्ण वनात प्रसिद्ध होता. त्याचं मोठं शेत होतं. त्याच्या शेतात बरीच धान्यं पिकायची. तांदुळ, गहू, ज्वारी, बाजरी; झालच तर गाजर, मुळा, भुईमुगाच्या शेंगा, रताळं असं सगळं काही भरभरुन यायचं. बंटी आणि त्याची बायको बनी, दोघही शेत फुलवण्यासाठी खुप मेहनत घ्यायचे. त्यांना खतपाणी द्यायचे, जमिनीची मशागत करायचे. त्यामुळे बंटीच्या शेतात चांगलं पिक यायचं. गाजरं तर इतकी लाल आणि रसरशीत असायची आणि चवीला तर एकदम गोड. आणि मुळा तर एकदम पांढरा शुभ्र! वनातले सगळे प्राणी बंटी सशाकडूनच धान्य, कंदमूळं घ्यायचे.


रोज पहाटे ५ वाजता बंटी आणि बनी उठायचे, बरोबर भाकरी, भाजी आणि थोडीशी चटणी घ्यायचे आणि निघायचे शेतावर. एके दिवशी काय झालं, पहाटे पहाटे बंटी आणि बनी आले शेतावर. कारण त्यांना पिकांची कापणी करायची होती. गाजरं, मुळा उपटून ते स्वच्छ धुवुन विकण्यासाठी तयार करायचे होते. पण दोघजणं येऊन बघतात तर काय, गव्हाचं पिक कोणीतरी कुरतडलेलं होतं, तांदळाची पाती कोणीतरी खाऊन टाकली होती. आणि गाजरं, मुळे अर्धवट खाल्लेले होते. ‘बापरे! कोणी केलं असेल हे?’ बंटी बनीला म्ह्णाला. ‘अहो आता काय करायचं? वनातल्या प्राण्यांना काय द्यायचं?’ बनी काळजीने म्हणाली. बंटी म्हणाला, ‘घाबरु नकोस बनी. आपण जी पिकं, कंदमुळ चांगली आहेत, ती काढुन ठेवु. आणि काम झालं की ह्यावर विचार करु.’ बंटी असं म्हणाल्यावर बनी जोरात कामाला लागली. 


बंटीने गव्हाची, तांदुळाची सगळी चांगली पिकं काढली. त्यातुन दाणे बाजुला काढले आणि पोती भरुन ठेवुन दिली. बनीने सगळी गाजरं उपटली, मुळे उपटले. चांगले होते ते ठेवून दिले आणि जे अर्धवट खाल्लेले होते ते टाकून दिले. नाही म्हटलं तरी पन्नास पोती तरी गहू, तांदुळ, गाजरं आणि मुळ्याने भरली. ‘पण शेतात घुसुन कोणी धान्य आणि कंदमुळं खाल्ली असतील?’ हा विचार काही बंटी आणि बनीच्या मनातुन जाईना. ‘हे काम कोणीतरी रात्रीच केलेलं आहे.’ बंटी विचार करता करता म्हणाला. ‘पण शोधुन कसं काढायचं?’ दोघही डोकं खाजवत विचार करायला लागले. शेवटी बंटी आणि बनीने रात्री पहारा देऊन ते शोधुन काढायचं ठरवलं. एकेक करुन दोघही पहारा देऊ लागले. १० वाजून गेले, ११ वाजुन अर्धा तास झाला तरी शेतावर काही कोणी आल्याचं बंटीला आणि बनीला दिसलं नाही. 


मध्यरात्र झाली होती. रातकिड्यांचा किर्रर्र आवाज येत होता. तेवढ्यात बंटीला शेतात पावलांचे आवाज ऐकु आले. बंटी आणि बनी दोघही कानोसा घेऊन ऐकु लागले. चिंची घुस आणि मोन्या उंदीर शेतात शिरलेले त्यांनी पाहिले. चिंची आणि मोन्या संपूर्ण शेतभर इकडे तिकडे फिरत काही खायला मिळतय का ते बघत होते. पण बंटी आणि बनीने सकाळीच सगळं पिक काढून ठेवलं होतं, त्यामुळे त्यांना काहीच खायला मिळत नव्हतं. चिंची आणि मोन्या हात हलवत आल्या पावली परत गेले. ‘चिंची आणि मोन्या आहेत तर ह्या सगळ्या मागे!॰’ बंटी म्हणाला. ‘पण आता ह्यांचं काय करायचं?’ बनी बंटीला विचारत होती. ‘ते बघू. उद्या सकाळी त्यावर विचार करु.’ बंटी असं म्हणाला. आणि दोघही घरी झोपायला गेले. 


दुस-या दिवशी येऊन पहातात तर काय, शेतातली सगळी माती छान भुसभुशीत झालेली. त्याचं काय झालं, चिंची आणि मोन्याने खायला मिळावं म्हणून संपूर्ण शेत पिंजुन काढलं. एकदा चिंची जमिनीखाली जाउन बघायची, एकदा मोन्या. त्यामुळे शेतातली सगळी जमीन छान भुसभुशीत झाली होती. ‘अरे वा, चला आपलं कामच झालं.’ बनी टाळ्या वाजवत म्हणाली. पण बंटी मात्र काही खुष दिसत नव्हता.’ बनी अगं आपलं काम जरी झालं असलं, तरी ह्या दोन चोरांना आपलं शेत खाण्यासाठी चांगलच आंदण म्हणून मिळालय. आपण त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे.’ बंटी विचार करत म्हणाला. ‘बंदोबस्त कशासाठी?’ बनीने अगदी आश्चर्याने विचारलं. ‘अगं, ते नेहमीच आपल्या शेतात येत रहातील. आणि आपलं पिक कुरतडत रहातील. आज हे दोघजणं आहेत. उद्या अजून येतील.’ बनीला बंटीचं म्हणणं पूर्णपणे पटलं. पण ह्यावर उपाय काय? दोघं विचार करत होते. एवढ्यात बंटीला एक कल्पना सुचली. त्याने घरातलं थोडसं धान्य, काही गाजरं आणि काही मुळ्याची पानं घेतली. 


आणि गेला चिंची आणि मोन्याकडे. चिंची आणि मोन्या तर बंटीला बघून चांगलेच घाबरले. बंटी म्हणाला, ‘घाबरु नका, मला माहितीय तुम्ही माझ्या शेतातलं धान्य चोरुन खाता ते. पण मी काही तुम्हाला पकडून द्यायला आलेलो नाही. तुम्हाला काल माझ्या शेतात काहीच खायला मिळालं नाही. पण त्यामुळे माझ्या शेताची माती मात्र चांगलीच भुसभुशीत झाली. आणि म्हणूनच तुमचे आभार मानण्यासाठी मी हे थोडसं धान्य आणि गाजरं घेऊन आलेलो आहे.’ चिंची आणि मोन्या तर बघतच राहिले. ‘बंटीने चक्क आपले आभार मानले?’ त्या दोघांनाही विश्वासच बसत नव्हता. बंटी त्यांना म्हणाला, ‘आणि म्हणूनच मी तुम्हाला एक आमंत्रणही देण्यासाठी आलेलो आहे. पुढच्या महिन्यात, माझं शेत परत धान्यांनी, कंदमुळांनी बहरुन येईल. तुम्ही हवं तेवढं आणि हवं ते खाऊ शकता.’ चिंची आणि मोन्याचा आनंद तर गगनात मावत नव्हता. बंटीने तर आमंत्रण दिलय म्हटल्यावर काय विचारायलाच नको. 


बंटीने लगेच चिंची आणि मोन्यासाठी तयारी सुरु केली. जमिनीला अजुन खतपाणी दिलं, वेगवेगळ्या भाज्या, कंदमुळं लावली. पण तो कुठल्या भाज्या लावतोय, ते मात्र अजिबात सांगितलं नाही हं त्याने. बंटी आणि बनी जोरात कामाला लागले होते. एक महिना पूर्ण होत होता आणि इकडे बंटीचं शेत फुलत होतं. चिंची आणि मोन्याला आठवण करुन देण्यासाठी बंटी स्वतः गेला. आणि त्यांना बरोबर मध्यरात्र सुरु झाल्यावर शेतात यायला सांगितलं. 


११ वाजून गेले होते, मध्यरात्र होत आली होती. बंटी आणि बनी एका झुडपाच्या मागे लपून बसले होते. तेवढ्यात शेतात पावलं वाजली. चिंची आणि मोन्या शेतात आले होते. त्यांना तर कधी एकदा खातोय असं झालं होतं. ‘आज अगदी फडशा पाडून टाकु.’ मोन्या कुजबुजला. ते शेताच्या एका भागात आले. तिकडे ब-याच वेली होत्या. ‘अरे वा, बंटीने काकड्या लावलेल्या दिसतायत.’ चिंची म्हणाली. त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. आणि असं म्हणून तिने आणि मोन्याने एका वेलाची काकडी काढली आणि त्याचा घास तोडला. ‘शी! ही कुठली कडू कडू काकडी?’ मोन्या तोंडातला घास थुकत म्हणाला. पण ती काकडी नव्हतीच मुळी. ते कडू कडू कारलं होतं. चिंची आणि मोन्याने त्या काकड्यांचा नाद सोडला आणि आता दुस-या भागात गेले. ‘अरे वा, गाजराचा पाला!’ असं म्हणून त्यांनी लगेच तो उपटला आणि तोंडात टाकला. पण ‘शी! हे काय कडू कडू आहे? मेथी?’ दोघही तोंडातला पाला थुकत होते. इतक्यात चिंचीला समोर गाजरांचा ढिग दिसला. ‘जाऊ दे, निदान गाजरं तरी खाऊ!’ असं म्हणत, त्यांनी गाजरं खायला सुरुवात केली. पण बंटी आणि बनीने त्याला बिब्ब्याचं तेल लावुन ठेवलं होतं. त्यामुळे दोघांचेही चेहरे सुजायला लागले. आणि भोपळ्यासारखे टम्म फुगले. त्यांचे अवतार बघून बंटी आणि बनी हसत हसत बाहेर आले. ‘काय कराल परत चोरी? खाल माझ्या शेतातलं धान्य?’ बंटीने हसत हसत विचारलं. ‘नाही. कधीच नाही.’ चिंची आणि मोन्या काकुळतीला येऊन म्हणाले. शेवटी बंटी आणि बनीने त्यांना शेतातुन हुसकावून लावलं. आणि त्यानंतर ते परत वनराईत कधीच दिसले नाही.