चोरावर मोर 
Choravar Mor



रानात बोरं आणण्यासाठी चाललेल्या एका बारा तेरा वर्षाच्या मुलाला तहान लागली, म्हणून तो वाटेत लागलेल्या विहिरीत पाणी आहे किंवा काय, हे पाहण्यासाठी त्या विहिरापाशी गेला. त्या विहिरीत तो डोकावून पाहू लागला असता, त्याला समोरुन एक उग्र व खुनशी चर्येचा चोर पाठीवर गाठोडं घेऊन, आपल्याच दिशेने येत असलेला दिसला. 


हा चोर एकतर आपल्याला मारील, किंवा पळवून नेऊन चोर्‍या करायला लावील,' असं वाटल्यावरुन तो मुलगा त्या विहिरात पाहून मुद्दाम हमसाहमशी रडू लागला.त्या रडणार्‍या मुलाजवळ येऊन त्या चोरानं विचारलं, काय रे? तुला रडायला काय झालं?' 


तो मुलगा आपल्या रडण्यात खंड पडू न देता त्याला खोटच म्हणाला, ‘मी या विहिरीत किती पाणी आहे हे पाहण्यासाठी वाकून पाहू लागलो असता, माझ्या गळ्यातली सोन्याची कंठी या विहिरीत पडली. आता कंठीशिवाय जर मी घरी गेलो तर आई-बाबा मला बेदम चोप देतील.' 


तुझी कंठी तुला काढून देतो, असं त्या मुलाला खोटचं सांगून, आणि चोरीचे पैसे व दागिने यांनी भरलेलं आपलं बोचकं त्याला विहिरीबाहेर उभे राहून सांभाळायला सांगून आपण विहिरीत उडी मारावी व कंठी हाती लागताच, आपले बोचके व याची कंठी घेऊन आपण पसार व्हावं, असा बेत त्या चोरानं मनाशी केला. त्याप्रमाणे तो त्या मुलाला म्हणाला, ‘बाळा ! तू हे माझं बोचक सांभाळ; मी तुला तुझी कंठी विहिरीतून काढून देतो.’ 


त्या हुशार मुलाला चोराच्या मनातलं कळून आलं तरीही त्याने मुद्दाम त्या चोराला होकार दिला. त्याबरोबर त्या चोरानं विहिरीत उडी मारुन, तिच्या तळाशी त्या कंठीचा शोध सुरु केला. ही संधी साधून तो मुलगा त्या बोचक्यासह तिथून पसार झाला.गावात जाताच त्या मुलाने ते बोचके पोलिसठाण्यावर नेऊन दिले. पोलीसांनी घोड्यावर स्वार होऊन त्या चोराचा पाठलाग केला व त्याला पकडले. नंतर त्या मुलाच्या प्रामाणिकपणाबद्दल व चातुर्याबद्दल त्यांनी त्याला बक्षीस दिले.