समुद्र आणि नदया 
Samudra Aani Nadya


एक पंडित मोठा गर्विष्ठ होता, तो आपल्या विदयार्थ्यांस एके दिवशी तत्त्वज्ञान शिकवीत असता, एका विदयार्थ्याने त्यास सहज थट्टेने प्रश्न केला, ‘गुरुजी, अगस्ति ऋषिंनी समुद्र प्राशन केला असे पुराणात सांगितले आहे, तर हे गोष्टी शक्य आहे काय ?’ पंडिताने मोठया आढयतेने उत्तर दिले, ‘शक्य आहे; इतकेच नव्हे तर मी स्वतः तुला समुद्र पिऊन दाखवितो; आणि जर मी तसे केले नाही तर मी तुला एक हजार मोहरा देईन.’ अशी पैज ठरल्यावर काही वेळीने पंडित शुध्दीवर आला आणि आपण भलत्याच गोष्टी संबंधाने पैज लावल्याबद्दल त्याला फार पश्चात्ताप झाला. मग तो कालिदासाकडे गेला आणि पैजेची गोष्ट त्यास सांगून म्हणाला, ‘ह्या एवढ्या संकटातून मला सोडवाल तर मी तुमचा फार आभारी होईन.’ पंडिताच्या मूर्खपणाबद्दल कालिदासास त्याची दया येऊन त्याने त्यास मदत करण्याचे कबूल केले. 


दुसऱ्या दिवशी पंडित, त्याचे विदयार्थी, कालिदास व गावातले पुष्कळ लोक समुद्रावर गेले. कालिदासाच्या सांगण्याप्रमाणे पंडिताने पुष्कळसे तांबे बरोबर आणले होते. ते पाहून पंडिताच्या मूर्खपणाबद्दल लोक फार आश्चर्यचकित झाले व तो काय करतो, याची ते मोठया उत्कंठेने वाट पाहात बसले. पुढे काय करावयाचे ते कालिदासाने त्याला पूर्वीच सांगून ठेवले होते. 


त्याप्रमाणे, ज्या विदयार्थ्याबरोबर त्याने पैज लावली होती, त्याजकडे पाहून तो म्हणाला, ‘अरे, ठरल्याप्रमाणे समुद्राचे सगळे प्राणी पिऊन टाकण्यास मी तयार आहे; परंतु ज्या शेकडो नदया समुद्रास येऊन मिळाल्या आहेत, त्यांचे पाणी समुद्रात सारखे वाहात राहिले आहे, ते पाणी बंद करण्याची तुझी तयारी आहे का ? नुसते समुद्रातले पाणी पिण्याचे मी कबूल केलेले नाही, हे तुला ठाऊकह आहे.’ हे भाषण ऐकून तो विदयार्थी निरुत्तर झाला व पंडिताच्या चातुर्याबद्दल सगळ्या लोकांनी त्याची फार तारीफ केली. 


तात्पर्य समयसूचकता हा गुण प्रसंगी मोठमोठया संकटांतून मनुष्याची मुक्तता करतो.