देव नांदतो आपल्या अंतरी 
Deva nandato apalya antari



श्याम नावाचा एक मुलगा होता. तुमच्यासारखाच शाळेत जायचा, रोज अभ्यास करायचा, चांगले मार्क मिळवायचा, आईला कामात मदत करायचा. असा तुमच्यासारखाच गुणी मुलगा होता तो. आई तर त्याचं नेहमी कौतुक करायची. ‘शहाणा माझा शामु!’ असही म्हणायची. मग श्यामु गालात खुदकन हसायचा आणि आईला बिलगायचा. श्यामचा दिनक्रम ठरलेला असे. तो सकाळी उठुन सुर्यनमस्कार घालायचा. मग घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांना नमस्कार करायचा, देवाला नमस्कार करायचा. आणि मग पटापट आवरुन शाळेत जायचा. तिथुन घरी आला की मग अभ्यास, थोडावेळ खेळणं, आईला घरकामात, आजीला वाती वळण्यासाठी मदत करायचा. मग संध्याकाळी जायचा बाहेर खेळायला. त्याचा हा गुणी स्वभाव बघून आई त्याला कधी कधी ओरडत नसे, बाबा रागवत नसत आणि आजी तर काय, त्याचे खूप लाड करत असे. पण म्हणून श्याम काही लाडावलेला नव्हता काही! कुठल्या गोष्टींसाठी हट्ट करायचा, कुठल्या गोष्टींसाठी नाही, हे त्याला व्यवस्थित कळत असे. तुम्ही पण उगाच करत नाही ना हट्ट? तसच श्यामचं पण होतं. श्याम वर्गात पण सगळ्यात हुशार होता. हो, पण आगाऊ मात्र अजिबात नव्हता हं. पण त्याला भारी प्रश्न पडत असत. हे असच का घडतं? पाऊस का पडतो? अन्न कसं तयार होतं? असे वेगवेगळे प्रश्न त्याला पडत असत. आणि त्या प्रश्नांची उत्तरं नाही ना मिळाली की श्याम ती उत्तरं शोधुन काढतच असे.


एकदा काय झालं, वर्गात सर गोष्ट सांगत होते. गोष्ट होती ‘देव आणि दानवांची’. दानव कसे साध्या माणसांना त्रास देतात, मग देव कसे त्या माणसांना येऊन सोडवतात, दानवांचं संकटं दूर करतात अशी साधारण गोष्ट होती ती. गोष्ट संपली आणि श्यामने सरांना प्रश्न विचारला, ‘सर, तुम्ही दानव पाहिलेत?’ सर म्हणाले, ‘नाही. मी कशाला पाहीन दानव?’ ‘मग तुम्ही देव पाहिलाय?’ श्यामने लगेच विचारलं. सर म्हणाले, ‘हो. पाहिला आहे तर. देवळात पाहिलाय.’ श्यामने लगेच दुसरा प्रश्न विचारला, ‘मग सर कसा होता देव? माणसांसारखा होता देव? आणि तो बोलला तुमच्याशी?’ आता मात्र सरांना हसायला आलं. ते म्हणाले, ‘अरे श्याम, देव असा बोलत नाही रे आपल्याशी. आणि तो माणसासारखा नसतोच मुळी. तो वेगळा असतो. आणि बरं का, आपण त्याच्याशी बोलायचं असतं. त्याची पूजा करायची असते. मग तो प्रसन्न झाला तरच बोलतो आपल्याशी!’ पण सरांनी असं सांगितल्यावरही श्यामचं निरसन मात्र काही होईना. ‘पण जरका तो बोललाच नाही, तर आपल्याला कसं वाचवणार? आपली संकटं कशी दूर करणार?’ श्यामचा असा प्रश्न ऐकल्यावर सर मात्र जरा गोंधळले. पण त्यांनी श्यामला समजावलं. ते म्हणाले, ‘श्याम , अरे देव नक्की येतो संकटांना धाऊन. आणि कसा येतो हे जर तुला जाणून घ्यायचं असेल, तर तु त्यालाच का नाही विचारत?’ सरांचं हे म्हणणं श्यामला अगदी पुरेपूर पटलं. ‘जर आपणच देवाशी बोललो तर? आणि तो आपल्याशी बोलणारच नाही, असं होणारच नाही!’ श्यामने असा विचार करत असतानाच शाळेची सुटण्याची घंटा वाजली. 


श्याम शाळा सुटून घरी येईपर्यंत देवाच्याच विचारात होता. घरात आल्या आल्या तो देवघरापाशी गेला. पण बघतो तर काय, देवाच्या मुर्त्या तर ढिम्म बसून होत्या. आता ह्यांना बोलतं कसं करायचं? तेवढ्यात श्यामला आईची हाक ऐकु आली. ती त्याला जेवायला बोलवत होती. श्यामने पटापट तोंड आणि हात-पाय धुतले, कपडे बदलले. आणि आला जेवायला. जेवायला आईने श्यामची आवडती भरल्या-वाग्यांची भाजी केली होती. ती भाजी बघुन त्याला खूप आनंद झाला. एवढ्यात त्याला कल्पना सुचली. त्याने आजीला विचारलं, ‘आजी, मला जशी वाग्यांची भाजी आवडते, तसं देवाला पण असच काही आवडत असेल ना!’ आजी म्हणाली, ‘हो तर. प्रत्येक देवाला काही ना काही पक्वान्न आवडतं.’ ‘मग सांग ना, कुठल्या कुठल्या देवाला काय काय आवडतं ते!’ श्यामने असा प्रश्न विचारल्यावर आजीला हसुच आलं. मग तीने कुठल्या देवाला काय आवडतं, ते सगळं सांगितलं. गणपतीला मोदक आवडतात, कृष्णाला दही-तुप आवडतं असं प्रत्येक देवाचं सांगितलं. हे सगळं सांगुन झाल्यावर आजीने विचारलं, ‘काय रे पण श्याम, तु हे सगळं का विचारतोयेस?’ पण श्याम मात्र त्यावर काहीच बोलला नाही. ‘आहे माझी एक गंमत….’ असं म्हणाला आणि हात धुवायला उठला. आई आणि आजी मात्र बघतच राहिल्या. ‘ह्या श्यामच्या डोक्यात नक्की काय चाललय?’ आजी आईकडे बघत म्हणाली. पण श्यामचं नक्की काय चाललं होतं. ह्याचा थांगपत्ता मात्र दोघींनाही नव्ह्ता. 


संध्याकाळ झाली होती, आजी देवाजवळ दिवा लावत होती. श्याम तिथे होताच. त्याने देवाजवळ हात जोडले आणि त्याला मनातल्या म्हणाला, ‘देवा मी आज तुझ्या आवडीचं पक्वान्न आणणार आहे. मग तरी तु माझ्याशी बोलशील ना?’ श्यामने डोळे किलकिले करुन पाहिले. पण देव मात्र काही बोलत नव्हता. तो आपला ढिम्म! पण श्यामने हार काही मानली नाही. रात्री सगळे झोपल्यावर श्याम हळूच देवघरापाशी आला. देवघरातला दिवा शांतपणे तेवत होता. श्यामने देवाला फुलं वाहिली. त्याच्यासमोर उदबत्ती लावली. अथर्वशिर्ष म्हटलं, प्रत्येकाच्या आवडीची वेगवेगळी पक्वान्न ठेवली. आणि राहिला बसून, देव कधी बोलेल हे बघत. पण कसलं काय, देव काही बोलायला तयार होईना. एक तास झाला, दोन तास झाले, रात्रीचा एक वाजत आला होता. पण देव काही बोलायला तयार नव्हता. श्यामला पेंग येत होती. आणि तो कधी झोपला ते त्याचं त्याला कळलही नाही. 


दुस-या दिवशी आई बघते तर काय, श्याम देवघरात झोपलेला. आईने आजीला बोलवलं, बाबांना बोलवलं. सगळ्यांनी श्यामला उठवलं. श्याम डोळे चोळत उठला, आणि त्याने विचारलं, ‘देव बोलला का?’ आईला काही कळेचना, बाबांनाही काही समजत नव्हतं. आजीने श्यामला विचारलं, ‘अरे श्याम देव कशाला बोलायला हवा?’ मग श्यामने काय घडलं ते सगळं सांगितलं. ‘अगं आजी, जर देव बोललाच नाही तर तो संकटं कशी दूर करणार?’ श्यामचं हे म्हणणं ऐकल्यावर सगळ्यांना हसुच आलं. आई हसु दाबत म्हणाली, ‘काय अरे श्याम, असं कधी होतं का? देव कधी बोलतो का?’ ‘पण मला देवाशी बोलायचं आहे.’ श्याम रडकुंडीला येऊन म्हणाला. मग आजी म्हणाली, ‘श्याम चल, देवाजवळ हात जोड. डोळे मीट. आणि मी सांगते ते शांतपणे ऐक. म्हणजे देव तुझ्याशी नक्की बोलेल.’ देव बोलणार म्हटल्यावर श्यामने लगेच डोळे मिटले, हात जोडले. आजी म्हणाली, ‘अरे देवाशी बोलणं फार सोप्पं नाही हं श्याम. खूप कठीण काम आहे ते. आणि तुला माहितीय का कठीण आहे ते?’ श्यामने नकारार्थी मान हलवली. ‘श्याम कारण देव ह्या देवघरात, मुर्तीत रहात नाही. तो सगळीकडे आहे. प्रत्येक माणसाच्या ह्रदयात आहे. त्यामुळे जरका तुला त्याच्याशी बोलायचं असेल, तर तुला माणसांशी चांगलं वागावं लागेल, त्यांना मदत करावी लागेल. पशु-प्राण्यांवर भुतदया दाखवावी लागेल. हे जर तु केलस तरच देव बोलेल तुझ्याशी.’ आजीने असं सांगितल्यावर श्यामला देवाचा खरा अर्थ कळला. देव मुर्तीत नाही, माणसात शोधायला हवा. आणि माणसाशी आपुलकीने बोललो म्हणजेच देवाशी बोललो, हे त्याला नीट कळून चुकलं. आणि तेव्हापासून श्यामने देवाच्या मुर्तीशी बोलायचा अट्टाहास सोडून दिला.