मी दूरचित्रवाणी बोलत आहे 
Me Doorchitranvani Bolte Aahe


तशी दूरचित्रवाणी सकाळी साडेसातपासून बोलत असतेच; पण त्या दिवशी गंमतच झाली. रात्रीचे साडेदहा वाजले. दूरचित्रवाणीवरचे कार्यक्रम संपले. नेहमीच्या कृत्रिम पद्धतीने निवेदिकेने नमस्कारासाठी हात जोडले आणि दूरचित्रवाणी संच बंद करावा म्हणून मी उठले. पण मला धक्काच बसला; कारण दूरचित्रवाणीवर चित्र दिसत नव्हते. पण आवाज मात्र ऐकू येत होता. विलक्षण मधुर आवाज-नेहमीच्या रूक्ष, कोरड्या व क्वचित कर्कश वाटणाऱ्या आवाजांहून कितीतरी वेगळा. अगदी स्नेहपूर्ण आवाजात कोणी तरी बोलत होते

 

"थांबा जरा, थोडा वेळ थांबा. तुमचा दूरचित्रवाणी संच बंद करू नका. मला तुमच्याशी बोलायचे आहे." तो आवाज थोडा अस्पष्ट होता. दबलेला भासत होता. कोणाची तरी त्याला भीती वाटत असावी आणि मग क्षणभर तो आवाज थांबलाही. पण कुतूहल वाटल्यामुळे मी दूरचित्रवाणी संच बंद केला नाही. उलट तेथेच कोचावर मी टेकले.


“मी दूरचित्रवाणी आहे, तुमची आवडती दूरचित्रवाणी." पुन्हा तोच स्नेहपूर्ण आवाज ऐकू येऊ लागला आणि आता पडदयावर एका सुंदर स्त्रीची आकृतीही दिसू लागली. विशेष म्हणजे अनेक यांत्रिक आभूषणे तिने धारण केली होती. अगदी मोकळ्या आवाजात ती बोलू लागली, "रसिक प्रेक्षकांनो, खूप दिवसांपासून मला तुमच्याशी बोलायचे होते. पण ही येथील सरकारी मंडळी मला ती संधीच देत नव्हती. आता आपण बोललो नाही तर ते स्वतःच्याच घाताला कारण होईल म्हणून मी माझे मनोगत व्यक्त करीत आहे.

 

"मित्रांनो, तुमची व माझी ओळख होऊन आता बरीच वर्षे झाली, पण या जगात मला अवतरूनही खूप वर्षे झाली. भारताच्या राजधानीत आज बरीच वर्षे मी वास्तव्य करून आहे. पण जेव्हा मी मुंबापुरीत आले तेव्हापासून माझा तुमच्याशी खूप परिचय झाला. आता महाराष्ट्रातील लोकांच्या दैनंदिन जीवनात मला प्रेमाचे स्थान आहे. तुम्ही सर्वजण माझ्यावर मनापासून प्रेम करता, पण माझ्या हातून तुमची जशी सेवा घडावी तशी घडतच नाही, याचेच मला फार वाईट वाटते. सध्या तरी त्याबाबतीत मी पराधीन आहे, गुलाम आहे, शासनयंत्रणेतील लोकांनी माझ्या नाड्या आपल्या हाती ठेवल्या आहेत...


“या अरसिक अधिकाऱ्यांचा पहिला फटका तुम्हांला बसतो याची मला कल्पना आहे. तुम्हांला अगदी रटाळ कार्यक्रम पाहावे लागतात. कित्येकदा तेच तेच कार्यक्रम 'फिर वही' या गोंडस नावाखाली पूनः पुन्हा दाखविले जातात. रंगीत रूप देऊन त्यांनी बाहयतः मला सजविले; पण माझा आत्मा-कार्यक्रमाचा दर्जा-दिवसेदिवस खालावत आहे. तुम्ही माझ्यावर रागावता. पण दोस्तांनो, त्यात माझा काय दोष? ही सर्व या लाल फितीची करामत आहे. हे सरकारी लोक आपले मित्र, स्नेही, आप्त यांनाच पूनः पून्हा कामे देतात आणि बराचसा मलिदा आपल्याच खिशात घालतात. पत्रोत्तराच्या वेळी मी तुमची पत्रे ऐकते; पण तुम्ही जी उत्तरे ऐकता ती माझी नाहीत हे लक्षात ठेवा.

 

"स्नेहयांनो, या जगात माझ्यासारखी दुःखी मीच आहे. कारण या कार्यक्रम नियोजन करणाऱ्यांनी माझा जीवनहेतूच हरवून टाकला आहे. खरे पाहता मी अवतरले ती ज्ञानदानासाठी. करमणूक करणे हा माझा दुय्यम हेतू ; पण आज मात्र दूरचित्रवाणी म्हणजे मनोरंजन एवढेच समीकरण झाले आहे, ते मला मान्य नाही. जेव्हा एखादया विशिष्ट पक्षाच्या प्रचारासाठी माझा उपयोग केला जातो, तेव्हा तर माझा जीवच गुदमरतो. बघू या, आता कल्पनेतील स्वायत्तता माझ्या वाटयाला केव्हा येते ती! ......"दूरचित्रवाणी बोलत होती आणि एकदम अंधार झाला कारण वीजच गेली होती. बहुधा ती वीज शासनाची आज्ञाधारक सेविका असावी!