दारूचे दुष्परिणाम 
Side Effects of Alcohol

 

दारूचे दुष्परिणाम आपण वर्षानुवर्षे पाहत आहोत, तरी ही मदिरा काही आपल्या समाजातून हद्दपार होत नाही. उलट दिवसेंदिवस विविध रूपांखाली ती आपल्या समाजावर अधिकाधिक आक्रमण करीत आहे आणि तिने घातलेली मगरमिठी अधिकाधिक घट्ट होत आहे. फार पुरातन काळापासून या दारूने धुडगूस घातला आहे. असुरांना सुरा पाजून देवांनी अमृत पळविले. संजीवनी मंत्र साध्य असूनही दैत्यांचा गुरू शुक्राचार्य दैत्यांना देवांवर जय मिळवून देऊ शकला नाही ते या दारूमुळेच. यादवांच्या थोर, शूर घराण्याचा नाश झाला तो मदयामुळेच. इतिहासकालातही या दारूने वेळोवेळी आपल्या लीला दाखविल्या आहेत.

 शूर संभाजीराजे शत्रूच्या हाती सापडले ते दारूमुळेच. इंग्रजांच्या अमलात मदयाला प्रतिष्ठा लाभली. राज्यकर्ते थंड देशातील, त्यामुळे मदयाची सवय आणि आम्ही गुलामी प्रजाजनांनी त्यांचे केवळ अनुकरण केले. लोकमान्य टिळकांनी तेव्हाच आपल्या लोकांना या व्यसनापासून दूर राहण्याची जाणीव दिली होती. महात्माजींनी तर दारूबंदीसाठी अनेकविध यत्न केले. दारूच्या दुकानांवर स्वयंसेवकांच्या साहाय्याने त्यांनी विरोधदर्शक निदर्शनेही केली. तरीपण आपल्या समाजात या व्यसनाने खूपच हातपाय पसरलेले आहेत.

आज गोरगरीब दारू पितात ते म्हणे कष्ट हलके करण्यासाठी, दु:ख विसरण्यासाठी आणि नंतर सवय झाली म्हणून. पुढे ही व्यसनाधीनता एवढी वाढते की, त्यांच्यातील माणूसच हरवून बसतो; मग बायकामुलांची उपासमार करून, प्रसंगी त्यांना मारझोड करूनही ते दारू पितात. या दारूमुळे त्यांना नाना रोग, व्याधी चिकटतात.

व्यसनांच्या आधीन झालेल्या माणसाचा विवेक संपतो. फक्त त्याला मदय प्यावयास हवे असते. मग आपण पितो आहोत ते काय आहे याचा तो विचार करीत नाही. मग कित्येकदा त्यांत विषारी द्रव मिसळल्याने शेकड्यांनी माणसे मरतात वा आंधळी होतात. तरीपण दारूड्यांचे डोळे उघडत नाहीत. कित्येकदा मदय घेऊन वाहन चालविल्याने मोठमोठे अपघात होतात.

ही झाली अशिक्षितांची, श्रमिकांची कथा; पण स्वतःला उच्चभ्रू समजणाऱ्या लोकांच्यात तर आज मदयपान ही एक फॅशन झाली आहे; प्रतिष्ठितपणाचे ते एक लक्षण झाले आहे. काही ना काही निमित्ताने या अशा 'ओल्या पाटर्या' आयोजित केल्या जातात. महत्त्वाच्या सभांच्या ठिकाणी तर मदयपान हे आवश्यक मानले जाते. आणखी एक वर्ग असा आहे की, तो मदयप्राशन करण्याची आपल्याला सनदच आहे, असे मानतो. हा वर्ग म्हणजे कलावंतांचा वर्ग. काही उत्कृष्ट गायक, उत्तम अभिनय करणारे कलावंत हे मदयाशी मैत्री करतात व आपले आणि आपल्या केलेचे अकाली मरण ओढवून घेतात.

असे हे मदय. सत्यानाश करणारे जालिम विष. पण गडकऱ्यांच्या 'एकच प्याला'मधील सुधाकर सांगतो त्याप्रमाणे एक गोष्ट नक्की की, हा ‘मदयाचा एकच प्याला' जवळ करण्यापूर्वीच दूर ठेवला तरच या व्यसनापासून आपण दूर राहू शकू; नाही तर हे मदय एकदा आपल्याजवळ आले की ते आपल्यापासून दूर होणे महाकठीण.