सर्कशीतील सिंहाचे आत्मवृत्त 
The Autobiography of Circus Lion


परवा मोठी गंमतच झाली. आम्ही सर्कस पाहावयास गेलो होतो. सर्कशीतील प्राण्यांचे कार्यक्रम मला विशेष आवडतात. सिंहांचे कार्यक्रम सुरू होते. सारे प्रेक्षक श्वास रोखून पाहत होते. एकापाठोपाठ एक सिंहाचे पिंजरे रिंगणात येऊन उघडले जात होते. पिवळ्या सोनेरी वर्णाचे, भरपूर आयाळ असलेले ते वनराज मोठ्या डौलात फिरत होते. फिरताना आपली पुच्छे ते अशी झोकात फिरवीत होते की पाहतच राहावे. एकेक सिंह रिंगणात उतरत होता व आपापल्या स्टुलावर स्थानापन्न होत होता. एवढयात एक नवल घडले. त्या सर्वांतील जो वयाने मोठा होता त्याने एक स्‍टुल सरकवत सरकवत तेथील टेबलाजवळ ठेवले. रिंगमास्तरही पाहत राहिला की हा आता काय करणार? आपले पुढचे दोन्ही पाय टेबलावर टेकून तो सिंह अगदी व्याख्यात्याच्या रुबाबात उभा राहिला. जणू तो भाषणच करीत होता.

मित्रांनो, हे युग भाषणांचे आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याची संधी असते. म्हणूनच ती संधी मी आज घेणार आहे. माझ्या मनीची व्यथा मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे. मला माहीत आहे की आज तुम्ही येथे माझा खेळ पाहावयास आला आहात, पण तरीही मी तुम्हांला माझे भाषण ऐकविणार आहे.” सर्कशीचा सारा तंबू अगदी शांत होता. सर्कस चालू असताना नेहमी वाजणारा बँडही ऐकू येत नव्हता. रिंगमास्तरही चाबूक हातात असूनही पुतळयाप्रमाणे स्तब्ध उभा होता.

 “दोस्तांनो, तुम्ही मला वनराज म्हणून संबोधता,” सिंह सांगत होता, “पण ज्याने वन पाहिलेही नाही तो वनराज कसा? अरे, माझा जन्म झाला या सर्कसच्या तंबूतच. माझे आईबाबाही येथेच सर्कसमध्ये होते. आयुष्यभर त्यांनी सर्कसमध्ये तीच तीच कामे केली, त्यासाठी धोकेही पत्करले, चाबकाचे फटकारे खाल्ले. माझा जन्म भारताबाहेर कुठेतरी झाला. लहानपण मोठ्या कौतुकात गेले. सर्कसचे मालक आणि त्यांचा मुलगा दोघेही माझे खूप लाड करीत. खूप खायलाप्यायला व झोपायला मऊ अंथरूण देत. त्यावेळी मला त्यांनी चाबकाची भीती कधी दाखविली नव्हती. त्यामुळे जीवन अतिशय रम्य होते, असे वाटत होते पण "बालपण सरले आणि त्याचबरोबर ती खुषीही हरवली. मी मोठा झाल्यावर माझा अध्ययन काळ सुरू झाला आणि मग अंगावर सपासप चाबकाचे फटकारे बसू लागले. काम करण्याचा कंटाळा येऊ लागला. स्वच्छंदपणे धावावे, हिंडावे असे वाटू लागले; पण भोवताली होता पिंजरा, त्याला भलेभक्कम कूलप. आता मला स्वातंत्र्याची जाणीव होऊ लागली होती, स्वतःची गुलामी उमगली होती. झाडावर स्वच्छंदपणे विहार करणाऱ्या कावळा-चिमणीचेही भाग्य आपल्या भाळी नाही, मग कसले आपण पशूनाथ? असा एकसारखा विचार येऊन मन विदीर्ण होत होते. जेव्हा लहान मुले सर्कशीचा शिकारखाना पाहावयास येतात ना, तेव्हा मी पाठ फिरवून बसतो. कारण मी 'केसरी' असलो तरी तेथे गुलाम आहे.

“या सर्कशीच्या मालकाबरोबर मी गावोगाव हिंडलो, सारे जग पाहिले. मला येथे भरपूर खावयास मिळते तरी मी येथे दुःखी आहे. का सांगू? माझे भवितव्य मला भेडसावते. एका प्रसंगाचा मोठा परिणाम माझ्या मनावर झाला आहे. तो म्हणजे माझ्या आईबाबांचा शेवट. माझे आईबाबा म्हातारे झाल्यावर रिंगणातील कामे करण्यास लागणारी चपळाई त्यांच्यात राहिली नव्हती. तेव्हा या सर्कसमालकाने त्यांना सुखाची भाकरी दिली नाही, तर त्यांना विकन टाकले. कुठे गेले असतील बरे ते? काय झाला असेल शेवट त्यांचा कोण जाणे? पण ते त्या वयात बनात तर नक्कीच जाऊ शकले नसतील.

“आयुष्यभर आम्ही इतरांचे मनोरंजन करतो, या सर्कसवाल्यांसाठी राबतो, मग आमचे भवितव्य निश्चित नको का? स्वातंत्र्य, स्वच्छंदता ही कधी आम्हांला गवसेल का?"

असा रोकडा सवाल टाकून सिंह आपल्या जागेवर गेला. सर्कसचे पुढचे खेळ सुरू झाले. पण आज त्यांत रंग भरला नाही.